(रत्नागिरी)
“मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन” विभागातून बोलत असल्याचा बनाव करून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ₹61,19,080 इतकी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीत कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली असून, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
फिर्यादी यांना “तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे” अशी भीती दाखवत, अज्ञात व्यक्तीने स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवले. पुढे पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करत, त्यांच्या नावावर कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खात्यातून दोन कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहार झाल्याचे सांगत, खात्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा क्रमांक 05/2024 नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता 2023 मधील कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66(सी) आणि 66(ड) अन्वये गुन्हा दाखल आहे.
तांत्रिक विश्लेषण व बँक व्यवहारांची कसून तपासणी केल्यानंतर, आरोपी राजीव विश्वनाथ तिवारी (वय 47, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) सध्या स्वरूप विहार, दिल्ली येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. मोबाइल लोकेशन उपलब्ध नसतानाही स्थानिक बातमीदारांच्या मदतीने त्याला शोधून काढण्यात आले आणि अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास व आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पो. नि. सौ. स्मिता सुतार, पोहवा रामचंद्र वडार, रोहन कदम, रामदास पिसे, संदीप नाईक, रमिज शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सायबर पोलिसांची नागरिकांना सावधानतेची सूचना
कोणीही “मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन”, “नॅशनल सिक्युरिटी” किंवा इतर कोणत्याही शासकीय खात्यातून बोलत असल्याचे सांगून तुमचे सिम कार्ड, बँक खाते अथवा वैयक्तिक माहिती मागत असेल, तसेच खात्रीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल, तर अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक व बँक संबंधित माहिती कोणालाही देऊ नये आणि अशा धमक्यांना बळी पडू नये.