(मुंबई )
राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘AI for Agri 2026’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
ही परिषद महाराष्ट्र सरकारच्या कृषी-एआय धोरण 2025–2029 अंतर्गत होत असून, देश-विदेशातील कृषी तज्ज्ञ, एआय स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कृषी-एआय क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या परिषदेचं आयोजन जागतिक पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्यानं करण्यात येत आहे. या परिषदेचे आयोजन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक, आशियाई विकास बँक (एडीबी), इक्रिसॅट, भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस्सी) आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्यानं होत आहे. या सहभागामुळे परिषदेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार आहे.
पहिला दिवस | 22 फेब्रुवारी 2026
पहिल्या दिवशी सकाळी 9 ते 10 या वेळेत नोंदणी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 10 ते 11.20 या वेळेत कृषी-एआय प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. यानंतर तीन समांतर सत्रांमध्ये चर्चा होणार आहे. पहिलं सत्र जबाबदार एआयच्या माध्यमातून लिंग-आधारित डिजिटल दरी कमी करण्यावर केंद्रित असेल. दुसऱ्या सत्रात कृषी उत्पादनासाठी सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा यावर चर्चा होईल, तर तिसऱ्या सत्रात संस्थात्मक वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून एआयला गती देण्यावर भर दिला जाईल.
सकाळी 11.30 ते दुपारी 1.05 या वेळेत नंदन निलेकणी, पियुष गोयल, देवेश चतुर्वेदी, परमेश्वरन अय्यर आणि देजान जाकोवेजिक यांची व्याख्याने होतील. दुपारी 2 ते 2.50 या वेळेत दीपक एस. पारेख, डॉ. मांगी लाल जाट, अभिषेक सिंह, मियो ओका आणि कांता सिंह मार्गदर्शन करतील.
दुपारी 3 ते 4.10 या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी ‘महाएजिक्स’, भिली आदिवासी भाषेचं मोठं भाषा मॉडेल, महाविस्तार व्हॉइस टेलिफोनी आणि कीटक-रोग ओळख प्रणालीचं लाँचिंग होणार असून, विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. संध्याकाळी समावेशकता, स्टार्टअप्ससाठी संधी, महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज आणि एआय तंत्रज्ञानावर सखोल चर्चा होईल. रात्री 7.30 ते 9 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
दुसरा दिवस | 23 फेब्रुवारी 2026
दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, डिजिटल कृषी वित्त मॉडेल्स आणि लिंग-समावेशक एआय धोरण यावर चर्चा होईल. दुपारी 12 ते 1 या वेळेत कृषी-एआयमधील गुंतवणूक संधी, सुरक्षा व जोखीम व्यवस्थापन आणि दूरसंवेदन तंत्रज्ञानावर सत्रे पार पडतील. दुपारी 2 ते 3 या वेळेत जागतिक एआय-सक्षम कृषी संशोधन नेटवर्क, महिला शेतकऱ्यांसाठी एआय उपाय आणि जनरेटिव्ह एआयवर चर्चा होईल. दुपारी 3.30 ते 5 या वेळेत गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधण्यात येईल. सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत समारोप सोहळा होऊन AI for Agri 2027 च्या थीमची घोषणा केली जाईल.
या परिषदेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट लाभ मिळण्यासोबतच कृषी क्षेत्रात एआयच्या माध्यमातून नव्या संधी खुल्या होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

