(नवी दिल्ली)
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सत्तेची 12 वर्षे पूर्ण होत असताना दुसरीकडे वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून रुपयाच्या घसरणीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. त्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी दरांवर झाला आहे.
सलग चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ
गेल्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 15 मे रोजी प्रतिलिटर 3 रुपयांची पहिली वाढ करण्यात आली. त्यानंतर 19 मे रोजी 94 ते 97 पैशांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा शनिवारी दरवाढ करण्यात आली आणि सोमवारी पेट्रोल-डिझेल दरात तब्बल पावणेतीन रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली. या सततच्या दरवाढीमुळे मालवाहतूक, सार्वजनिक प्रवास आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे.
मुंबईत मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या तपपूर्तीचा कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०२६ रोजी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण केली. त्यामुळे देशात मोदी सरकारची तपपूर्ती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मात्र, एकीकडे सरकारच्या कामगिरीचे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे जनतेत नाराजी आणि संताप वाढताना दिसत आहे.
सीएनजीही 12 दिवसांत 6 रुपयांनी महागला
पेट्रोल आणि डिझेलसोबतच सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 12 दिवसांत चार वेळा सीएनजी दरवाढ करण्यात आली असून एकूण 6 रुपयांची वाढ झाली आहे.
- 15 मे : 2 रुपयांची वाढ
- 17 मे : 1 रुपयांची वाढ
- 23 मे : 1 रुपयांची वाढ
- 26 मे : 2 रुपयांची वाढ
यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि मालवाहतूक खर्च वाढून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे.
दूध, भाजीपाला आणि किराणा दरही वाढले
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने दैनंदिन वापराच्या वस्तू महाग झाल्या आहेत. Amul, Mother Dairy आणि Gokul दूधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच पॅकबंद तांदूळ 42 ते 150 रुपये किलो दराने विकला जात आहे. भाजीपाला, किराणा साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले
सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या किंमतींमध्ये प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी 140 ते 145 रुपयांना मिळणारे खाद्यतेल आता 167 ते 187 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. 15 किलोच्या तेलाच्या कॅनसाठी ग्राहकांना 3000 ते 3500 रुपये मोजावे लागत आहेत. तूरडाळीसारख्या अत्यावश्यक वस्तूंचे दरही 100 ते 130 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
बाटलीबंद पाणी आणि FMCG वस्तूही महागणार
महागाईचा फटका आता बाटलीबंद पाण्यालाही बसण्याची शक्यता आहे. 1 लिटर पाण्याची बाटली 20 रुपयांवरून 25 रुपयांपर्यंत महाग होऊ शकते, तर 500 मिली बाटली 10 रुपयांवरून 12 रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय अंघोळीचा साबण, कपडे धुण्याची पावडर, पॅकबंद खाद्यपदार्थ आणि इतर घरगुती वस्तूंचे दरही एफएमसीजी कंपन्यांकडून वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळा अधिक तीव्रतेने बसू लागल्या आहेत.

