(रत्नागिरी / वार्ताहर )
संपूर्ण रत्नागिरी शहराची तहान भागवणाऱ्या शिळ धरणातून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. मात्र विडंबन म्हणजे, ज्या शिळ गावाच्या हद्दीत हे धरण उभे आहे, त्या गावातील ग्रामस्थांनाच आजही तुटलेल्या आणि जीर्ण अवस्थेतील विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या विहिरीची दयनीय अवस्था पाहता ग्रामस्थांच्या संतापात भर पडली असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
शिळ गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागत आहे. गावातील जीर्ण विहिरीच्या तुटलेल्या कठड्यांमुळे आणि धोकादायक अवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या विहिरीतून पाणी भरताना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाकडे या समस्येबाबत पाठपुरावा करण्यात आला. विहिरीची दुरुस्ती, सुरक्षित कठडे तसेच गावासाठी स्वतंत्र आणि नियमित पाणीपुरवठा यासाठी मागण्या करण्यात आल्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
एका बाजूला रत्नागिरी शहराला शिळ धरणातून नियमित पाणीपुरवठा केला जात असताना, दुसऱ्या बाजूला धरणग्रस्त गावातील नागरिकांना मूलभूत पाण्याच्या सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विहिरीची अवस्था अधिक धोकादायक बनली असून, एखादी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. “ज्या गावामुळे शहराला पाणी मिळते, त्याच गावाला सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी तातडीने विहिरीची दुरुस्ती, संरक्षक भिंत उभारणी आणि गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

