(रत्नागिरी / वार्ताहर)
शासनाने आठवड्यात ‘पांच दिवस’ कामकाजाचा निर्णय घेतल्यानंतरही रत्नागिरी येथील जातपडताळणी कार्यालयात कर्मचारी अजूनही नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरा हजेरी लावत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे. कार्यालयीन वेळेत येऊनही नागरिकांना संबंधित कर्मचारी येण्याची वाट पाहावी लागत असून, कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे जनतेमध्ये नाराजी वाढत आहे. जातपडताळणी कार्यालयात आता कर्मचाऱ्यांचीच पडताळणी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया यावेळी काहींनी दिली.
या खात्याशी संबंधित कामासाठी आलेल्या नागरिकांना आलेले अनुभव तसेच उशीर व ढिसाळ कामकाजाबद्दल कोणीही उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नाही. कारण तक्रार केली तर आपल्या अर्जात मुद्दाम त्रुटी काढून त्रास दिला जाईल, अशी भीती त्यांच्या मनात असते.
यावेळी समाजसेवक एजाज महमूद इब्जी यांनी येथे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर या कार्यालयातील शिस्तभंग प्रकार समोर आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी आठवड्यात ‘एक दिवस बोनस’ सुट्टी घेत असल्यासारखे वागत आहेत. कार्यालयात आपल्या मनाच्या वेळापत्रकाप्रमाणे उशिरा प्रवेश हा त्यांचा हक्क असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. यामुळे जनतेला विनाकारण दीर्घकाळ थांबावे लागत आहे. तसेच येथे बायोमेट्रिक हजेरीबाबतही कसलीच बंधने नाहीत, ती यंत्रणा सक्रीय आहे किंवा नाही याबाबतही प्रश्न आहे.
कार्यालयाबाहेर वेळेचे स्पष्ट फलक नसल्याने नागरिक संभ्रमात होतात. याबाबत कार्यालयीन वेळेचा बोर्ड लावण्यात यावा तसेच कर्मचारी वेळेचे पालन करतात का, याची वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी इब्जी यांनी केली आहे. एजाज इब्जी यांनी सांगितले की, ते या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच संबधित वरिष्ठ कार्यालयाकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहेत.

