(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी) यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात मंथन तसेच BDS स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मंथन स्पर्धा परीक्षेत कु. विहान निलेश म्हादये याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरी तालुक्यात २८ वा, जिल्ह्यात ४७ वा आणि महाराष्ट्र राज्यात ५७ वा क्रमांक मिळवला. तसेच कु. भूमिका प्रविण नागवेकर हिने केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला. या परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून ही बाब शाळेसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
तसेच BDS स्पर्धा परीक्षेतही शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून भूमिका प्रविण नागवेकर (इ. ४ थी), निनाद मनोज खर्डे (इ. ४ थी), विहान निलेश म्हादये (इ. ३ री), गंधार सत्यवान पेटकर (इ. ३ री) आणि कैवल्य ओंकार अभ्यंकर (इ. ३ री) हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले. शाळेचे संस्थापक दिलीप विठ्ठल गुरव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना पुष्प देत शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक मसरज शेख आणि शिक्षिका शनाज भाटकर यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात दिलीप गुरव यांनी शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत हा यशाचा आलेख पुढेही असाच वाढत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सौ. सत्यश्री खर्डे, मदतनीस सौ. स्नेहल कुरतडकर आणि श्रीमती शारदाताई गुरव यांची उपस्थिती लाभली होती.

