( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
लांजा तालुक्यातील भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था भाकर यांच्यातर्फे दरवर्षी अरुणा पुरस्कार प्रदान केला जातो. संस्थेच्या संस्थापिका आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेत्या समाजसेविका अरुणा देवेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार १३ ऑक्टोबर रोजी दिला जातो.
अरुणाताई पाटील यांनी किल्लारी भूकंप आपत्तीमध्ये मदतकार्य, अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा, पर्यावरण जनजागृती, गोकुळ बंधारे उभारणी, तंबाखूमुक्त अभियान असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या या समाजकार्याच्या परंपरेला पुढे नेत, समाजातील विकासात्मक व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
या पुरस्कारात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. २,५०१ इतक्या रोख रकमेचा समावेश आहे. २०२५-२०२६ या वर्षासाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले असून, इच्छुक महिला समाजसेविकांनी आपले कार्यवृत्त ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दोन प्रतींसह भाकर सेवा संस्था कार्यालय, अरुणा A-०६, शांती होम्स, ओसवाल नगर, ता.जि. रत्नागिरी येथे जमा करावे. तसेच प्रस्ताव ईमेल bhakar93@gmail.com वरही पाठवता येतील. याबाबत अधिक माहितीसाठी ८३७९९४७४९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

