(पुणे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या वैयक्तिक आयुष्यात लवकरच नवे पर्व सुरू होणार lआहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या नात्याला आता अधिकृत रूप मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 29 जुलै रोजी पुण्यातील एका खासगी फार्महाऊसवर दोघांचा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या वृत्तामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून राजकीय वर्तुळातही या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहात चर्चेत आली होती कायनात धार
नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार यांच्यासोबत पारंपरिक पोशाखात उपस्थित असलेली एक तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ती म्हणजे कायनात धार. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. आता साखरपुड्याच्या वृत्तामुळे त्या चर्चांना अधिक पुष्टी मिळाली आहे.
पुण्यातील फार्महाऊसवर होणार साखरपुडा
मिळालेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 जुलैदरम्यान पुण्यातील एका खासगी फार्महाऊसवर साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला पवार कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच काही निवडक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. साखरपुड्यानंतर विवाहाच्या तारखेची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय फूट पडली असली तरी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पवार कुटुंबीय एकत्र येत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या साखरपुड्यालाही पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पार्थ पवार यांची राजकीय वाटचाल
पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावत युवा नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली. अलीकडेच त्यांची राज्यसभेवर निवड झाली असून ते सध्या संसदेत पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
काय आहे कायनात धार यांची ओळख?
कायनात धार या व्यावसायिक आणि मॉडेल म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध माहिती समोर येत असली तरी अधिकृत सोर्सच्या माहितीनुसार त्या दिल्लीत शिक्षण घेतलेल्या असून सध्या दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी वास्तव्यास असतात. सोशल मीडियावर त्यांची चांगली उपस्थिती असून फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रातही त्या सक्रिय असल्याचे सांगितले जाते.
गेल्या काही महिन्यांत पार्थ पवार यांच्यासोबत त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरातील दर्शनाचे फोटो तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थिती यामुळे दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
मैत्रीचे प्रेमात रूपांतर
पार्थ पवार आणि कायनात धार यांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. कालांतराने दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले. अखेर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, 29 जुलै रोजी प्रस्तावित साखरपुड्याच्या तयारीला वेग आला असून, या सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियाचेही लक्ष लागले आहे. मात्र, पार्थ पवार किंवा पवार कुटुंबाकडून साखरपुड्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.

