(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण होऊन त्याला ‘राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66)’ हे अधिकृत नाव मिळून अनेक वर्षे झाली आहेत. देशभरातील शासकीय नोंदी, डिजिटल नकाशे आणि महामार्गावरील सर्व प्रमुख दिशादर्शक फलकांवर ‘NH 66’ असा उल्लेख असताना, संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे-जांभूळवाडी रस्त्यावर नुकताच बसविण्यात आलेल्या नव्या दिशादर्शक फलकावर मात्र ‘NH 17’ अशी जुनीच नोंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामीण रस्त्यांच्या विकासकामांतर्गत कोंडअसुर्डे-जांभूळवाडी मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी नुकताच नवीन दिशादर्शक फलक बसविण्यात आला आहे. या फलकावर सरळ दिशेला संगमेश्वर, उजवीकडे करजुवे, मागे पिर धामापूर, तर डाव्या बाजूला ‘NH 17’ असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या महामार्गाचे अधिकृत नामकरण ‘NH 66’ असे झाले असून अनेक वर्षांपासून त्याच नावाचा वापर केला जात आहे. तरीही नव्याने बसविण्यात आलेल्या फलकावर जुनी माहिती वापरण्यात आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे हा फलक पूर्णपणे नवीन असून त्याचा खांब, पाटी आणि आजूबाजूची कामे पाहता तो नुकताच उभारण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. फलकाजवळच रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेले डांबर आणि खडीचे ढीगही दिसून येतात. म्हणजेच लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करून नवीन फलक उभारला गेला, मात्र त्यावरील माहिती अद्ययावत करण्याची साधी खबरदारीही घेण्यात आली नाही.
या प्रकारामुळे फलक तयार करणारा ठेकेदार आणि त्याची तपासणी करून मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महामार्गाचे अधिकृत नाव बदलून अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही चूक आली नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कोंडअसुर्डे-जांभूळवाडी मार्गावरून मुख्य राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हा दिशादर्शक फलक महत्त्वाचा आहे. विशेषतः बाहेरून येणारे पर्यटक आणि प्रथमच या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अशा फलकांवरील माहितीच मार्गदर्शक ठरते. त्यामुळे चुकीच्या उल्लेखामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, तसेच चुकीचा फलक तातडीने हटवून ‘NH 66’ असा अधिकृत उल्लेख असलेला नवीन दिशादर्शक फलक बसवावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने सर्व दिशादर्शक फलकांची तपासणी करण्याचीही मागणी होत आहे.

