(चेन्नई/मदुराई वृत्तसंस्था)
२०२० मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या “सथानकुलम कस्टोडियल डेथ” प्रकरणामध्ये न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर असा निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तामिळनाडू पोलिस दलातील ९ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने हा गुन्हा “दुर्मिळात दुर्मिळ” असल्याचे नमूद करत पोलिसांनी केलेली कृती अत्यंत निर्घृण आणि अमानुष असल्याचे स्पष्ट केले. सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनीही मृत्युदंडाची मागणी केली होती.
6 एप्रिल 2026 रोजी, मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पिता-पुत्राच्या मृत्यूने देश हादरला
ही घटना सथानकुलम येथे घडली होती. व्यापारी पी. जयराज (५८) आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स (३१) यांना १९ जून २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोरोना लॉकडाऊनदरम्यान दुकान वेळेनंतर सुरू ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, पोलीस कोठडीत त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यांच्या गुप्तांगांना इजा पोहचवण्यात आली आणि रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांना छळण्यात आले. गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे २२ आणि २३ जून रोजी दोघांचा मृत्यू झाला.
६ वर्षांनंतर न्याय; CBI तपासात धक्कादायक पुरावे
या प्रकरणाची सुनावणी सुमारे सहा वर्षे चालली. तपासादरम्यान केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) ने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या भिंतींवर पीडितांच्या रक्ताचे डाग आढळल्याचे समोर आले, ज्यामुळे पोलिसांच्या क्रूरतेची पुष्टी झाली. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले की, “ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती, त्यांनीच नागरिकांच्या जीवाशी खेळ केला.”
९ पोलिस दोषी; फाशी आणि नुकसानभरपाईचे आदेश
या प्रकरणात तत्कालीन इन्स्पेक्टर श्रीधर, सब-इन्स्पेक्टर बालकृष्णन आणि रघु गणेश यांच्यासह एकूण ९ पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले. यापैकी एका आरोपीचा मृत्यू आधीच झाला आहे. न्यायालयाने दोषींना मृत्युदंडासोबतच पीडित कुटुंबाला सुमारे १.४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांच्या ताब्यातील मृत्यू (custodial deaths) या विषयावर मोठी चर्चा झाली होती. या निकालामुळे पोलीस यंत्रणेमधील गैरप्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

