(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सामाईक घर आणि जमिनीच्या वादातून मिरजोळे भाटकरवाडी येथे एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद एवढा विकोपाला गेला की, चिव्याच्या काठ्या, लोखंडी कुऱ्हाड आणि दगडांचा वापर करत एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एकूण नऊ जणांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.
ही घटना शनिवारी रात्री मिरजोळे येथील भाटकरवाडीत घडली. सामाईक घर आणि जमिनीच्या मालकीवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून हा संघर्ष उफाळून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदानंद पांडुरंग मयेकर (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीत ओंकार दत्ताराम मयेकर, दत्ताराम शांताराम मयेकर आणि दर्शना दत्ताराम मयेकर (सर्व रा. मिरजोळे-भाटकरवाडी) यांनी त्यांच्या घरात घुसून वाद घातल्याचे म्हटले आहे. घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि ओंकार मयेकर यांनी चिव्याच्या काठीने डोक्यात मारून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे, कृष्णा शांताराम मयेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयितांनी अंगणातील कचरा उचलला नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या मारहाणीत कृष्णा मयेकर जखमी झाले. दरम्यान, ओंकार दत्ताराम मयेकर यांनीही शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दुपारच्या वादाचा राग मनात धरून सदानंद मयेकर आणि कृष्णा मयेकर यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. कामावरून घरी परतल्यानंतर लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर वार करण्यात आला, तर त्यांच्या आईच्या बोटाला चावा घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय दगड घेऊन मारण्यास धावून आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
एका किरकोळ कचऱ्याच्या कारणातून पेटलेल्या या वादामुळे एकाच कुटुंबातील नातेसंबंध अक्षरशः रक्तबंबाळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींनुसार नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस अंमलदारांकडून केला जात आहे.

