(दापोली)
पुण्यातील बैठक फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने दापोली तालुक्यातील २५ शाळांतील विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक कलांचा परिचय आणि प्रशिक्षण देण्यासाठी APT (Art, Performance, Training) प्रकल्प राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात ७, ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी झाली असून, प्रत्येक महिन्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अनुभव, परिचय आणि तालमीच्या माध्यमातून विविध कलाप्रकार शिकवले जाणार आहेत.
या उपक्रमाचा पहिला टप्पा ‘अनुभव सत्रां’चा असून, पहिलं सत्र जि.प. शाळा साखळोली क्र. १ येथे पार पडले. या सत्रात कथक नृत्यांगना धनश्री जोगळेकर यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याची ओळख करून दिली. त्यांनी “वंदना”, “ताल १४ आकड्यांचा धमार-घड्याळ”, तसेच श्रीकृष्णाचे विविध रूपे — गोवर्धन पर्वत, ब्रह्मांड, कस्तुरी मृग आणि कालियामर्दन — नृत्याभिनयाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केली.
मुख्याध्यापक संजय मेहता यांनी सांगितले की, “एकही शब्द न बोलता संपूर्ण कथा नृत्याच्या माध्यमातून मांडण्याची ताकद आपल्या शास्त्रीय परंपरेत आहे,” हे विद्यार्थ्यांना अनुभवता आले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तेजस्वी उर्जा दिसून आली.
या संपूर्ण उपक्रमामागे कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट्स यांचे आर्थिक सहकार्य असून, बैठक फाउंडेशनच्या मुख्य कार्यवाह दाक्षायणी आठल्ये आणि विश्वस्त मंदार कारंजकर यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले, “New Education Policy (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये बहुआयामी कलाभिरुची विकसित करण्यासाठी APT प्रकल्प अत्यंत उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन यासाठी बैठक फाउंडेशनचे प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरतील.”
ऑगस्ट महिन्यात पुढील सत्र पार पडणार असून, यामध्येही दर्जेदार कलाकार विद्यार्थ्यांना पारंपरिक कला शिकवतील. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही भारतीय सांस्कृतिक वैभवाचा अनुभव मिळणार आहे.