( पोलादपूर / चंद्रकांत कोकणे )
सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुणांवर काळाने घाला घातला आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बीचवर फिरून परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. भरधाव स्कॉर्पिओ तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळल्याने आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांपैकी पाच तरुण हे सातारा तालुक्यातील आसगाव गावातील असून ते एकाच वाडीत राहणारे चांगले मित्र होते. रात्रीपासून या गावातील प्रत्येक घरात आक्रोश सुरू असून महिलांचा हंबरडा आणि नातेवाईकांचा टाहो पाहून येथील वातावरण सुन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी हे सर्व तरुण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हर्णे बीच परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दिवसभर फिरून मजामस्ती केल्यानंतर ते रात्री साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र आंबेनळी घाटातील दाभिळ गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली.
आंबेनळी घाटातील तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओमुळे संपूर्ण परिसर हादरला. दुर्घटनेनंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. आंबेनळी घाटात दाभिळ टोकाजवळ झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आज दुपारी महत्त्वपूर्ण यश मिळाले. सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या दिशेने दरीत उतरलेल्या बचाव पथकांनी अपघातग्रस्त वाहनापर्यंत पोहोचत चौथा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. यामुळे आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

सुरुवातीला बचाव पथकांनी घाटाच्या वरच्या बाजूकडून दरीत उतरून शोधमोहीम राबवली. मात्र, वाहन आणि मृतदेह ज्या ठिकाणी अडकले होते तो भाग अत्यंत दुर्गम आणि धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बचाव पथकांनी रणनीती बदलत सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या दिशेने पर्यायी मार्गाने दरीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला वेग देण्यात आला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथके दरीच्या तळाशी आणि अपघातग्रस्त स्कॉर्पिओपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली.
सावित्री नदी परिसरातील घनदाट जंगल, निसरडे उतार, खडकाळ भूभाग आणि दरीची प्रचंड खोली यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. अंधार आणि खराब भौगोलिक परिस्थितीमुळे प्रत्येक पाऊल टाकताना मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे. तरीही बचाव पथके दोरखंड, स्ट्रेचर आणि तांत्रिक साधनांच्या सहाय्याने सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत.
दरम्यान, उर्वरित चार जणांचा शोध सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागले आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे :
- महेश अनिल पवार (वय 25 वर्ष)
- आदित्य अशोक साळुंखे (वय 21 वर्षे)
- रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25 वर्षे)
- सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20 वर्षे
- अंश समीर चव्हाण (वय 18 वर्षे)
- उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21 वर्षे)
- अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25 वर्ष)
- नितीन किसन नायकोंडे (वय 35 वर्ष)

