(पुणे / पिंपरी-चिंचवड)
रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत असलेल्या पत्नीवर ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली बुद्रुक येथे 39 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपांमुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि याच तणावाचा शेवट या दुःखद घटनेत झाला.
नेमकं काय घडलं?
कुमार ऐश्वर्य (वय 39, रा. चऱ्होली बुद्रुक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिस तपासानुसार, कुमार यांच्या पत्नी प्रीती ऐश्वर्य या रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ठाणे येथे एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर कुमार तीव्र मानसिक तणावाखाली होते. 29 जानेवारी रोजी याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादानंतर कुमार यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले आहे. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडल्याने पत्नीने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान प्रकृती खालावली
रुग्णालयात उपचार सुरू असताना सुरुवातीला कुमार यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र रविवारी रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण रात्री साडेदहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर चऱ्होली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनेला दुजोरा दिला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
टीप: मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास त्वरित मदत घ्या. कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञांशी बोला. भारतात राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाईन 14416 किंवा 1-800-891-4416 वर संपर्क साधता येतो.

