(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा प्रचंड लाटेच्या तडाख्यात समुद्रात वाहून जाण्याचा थरारक प्रकार घडला. काही क्षणांसाठी किनाऱ्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान, धाडस आणि मानवतेचे दर्शन घडवत करण मिलके या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उधाणलेल्या समुद्रात झेप घेत संबंधित महिलेला सुखरूप बाहेर आणत अक्षरशः जीवदान दिले. या साहसी बचावकार्याबद्दल आता सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून रत्नागिरी पोलिसांकडूनही त्याचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
सबीला भाटकर (वय ३५, रा. भाटकरवाडा) असे बचाव करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी त्या भगवतीनगर किनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, अचानक उसळलेल्या प्रचंड लाटेने त्यांचा तोल गेला आणि त्या थेट समुद्रात कोसळल्या. भरतीच्या तीव्र प्रवाहामुळे त्या क्षणार्धात खोल पाण्याकडे वाहून जाऊ लागल्या. परिस्थिती गंभीर होताच त्यांनी मदतीसाठी आर्त हाक मारली.
याचवेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या मिलके कुटुंबाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तत्काळ धाव घेतली. मिलके सर यांनी परिस्थितीचे अचूक आकलन करत बचावकार्याचे मार्गदर्शन केले, तर गौरी मिलके यांनीही मोठी तत्परता दाखवत मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, करण मिलके याने क्षणाचाही विलंब न लावता थेट उधाणलेल्या समुद्रात झेप घेतली. वेगवान प्रवाह, उसळणाऱ्या लाटा आणि जीवघेण्या परिस्थितीशी झुंज देत त्याने सबीला भाटकर यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. हा संपूर्ण प्रकार काही काळ अंगावर काटा आणणारा ठरला. किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांनी श्वास रोखून हे बचावकार्य पाहिले. अखेर महिलेची सुखरूप सुटका होताच परिसरात सुटकेचा निश्वास सोडण्यात आला. त्यानंतर सबीला भाटकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची दखल घेत रत्नागिरी पोलीस दलाने करण मिलके यांच्या धाडसी व मानवतावादी कृतीचा विशेष गौरव केला. मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा. पो. से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते करण मिलके यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका महिलेचे प्राण वाचविणाऱ्या त्यांच्या साहसी कृतीबद्दल पोलीस दलाने विशेष कौतुक व्यक्त केले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भगवतीनगर किनाऱ्यावर घडलेल्या या घटनेने धैर्य, मानवता आणि प्रसंगावधान यांचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले असून करण मिलके यांच्या साहसाची चर्चा आता जिल्ह्यासह राज्यात होत आहे.

