(मुंबई)
गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी ‘इंडिया–फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमानिमित्त सायंकाळी भव्य ध्वनी-प्रकाश शोचे आयोजन करण्यात आले. फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने भारत–फ्रान्स मैत्रीचे नवे पर्व उजळून निघाले.

या कार्यक्रमास राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
२०२६ हे वर्ष भारत आणि युरोपमधील संबंधांमध्ये मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. युरोपियन युनियनसोबतचा मुक्त व्यापार करार केवळ भारत–युरोप संबंधांनाच नव्हे, तर भारत–फ्रान्स धोरणात्मक भागीदारीलाही अभूतपूर्व गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी करण्यात आलेल्या करारामुळे दोन्ही देशांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. २०२६ हे वर्ष भारत–फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून, “आम्ही आमच्या भागीदारीचे रूपांतर लोकांच्या भागीदारीत करत आहोत,” असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील दीर्घकालीन आणि विश्वासार्ह संबंधांवर भर दिला. फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून या भागीदारीला नवी ऊर्जा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
“भारत आणि फ्रान्स हे लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि बहुध्रुवीय जगासाठी कटिबद्ध आहेत. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा गरजेच्या आहेत. दहशतवादाच्या सर्व स्वरूपांविरोधात आम्ही एकत्र उभे आहोत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या भेटीदरम्यान कर्नाटकातील वेमागल येथे एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या फायनल असेंब्ली लाइनचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले. तसेच मोदी आणि मॅक्रॉन यांनी भारत–फ्रान्स इनोव्हेशन फोरमचेही उद्घाटन केले.
संरक्षण, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात मोठ्या घोषणा
भारत आणि फ्रान्सने संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, महत्त्वपूर्ण खनिजे, आरोग्य आणि कौशल्य विकास अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या. होरायझन 2047 रोडमॅपच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक परराष्ट्र मंत्रिस्तरीय संवाद सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत–फ्रान्स इनोव्हेशन नेटवर्कचा शुभारंभ, वेमागल येथील H125 असेंब्ली लाइन, तसेच भारतात हॅमर क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी BEL आणि Safran यांच्यातील संयुक्त उपक्रम याचाही यात समावेश आहे.
संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आणि फ्रान्समधील मैत्रीला सीमा नाहीत. ही भागीदारी खोल महासागरांपासून उंच पर्वतांपर्यंत पोहोचते.” त्यांनी मार्सेल शहराशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ देत भारत–फ्रान्स संबंधांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पाया अधोरेखित केला.
मॅक्रॉन यांचा भारत दौरा; सांस्कृतिक संवादालाही चालना
अध्यक्ष मॅक्रॉन आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, एआय इम्पॅक्ट समिटसाठी ते भारतात आले आहेत. मुंबईत त्यांनी बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माते आणि कलाकार यांच्याशी संवाद साधला. ताजमहाल पॅलेस हॉटेल येथे झालेल्या या भेटीत झोया अख्तर, शबाना आझमी, मनोज वाजपेयी, अनिल कपूर, कबीर खान, नीरज घायवान, रिचा चढ्ढा आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे भारत–फ्रान्स संबंध केवळ राजनैतिक आणि संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, नवोन्मेष, संस्कृती आणि लोकांमधील संबंधांपर्यंत अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

