(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी-पारसनगर येथे ८ महिन्यांच्या मुलीची आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, सतत रडत असल्यामुळे आईने बुधवारी संध्याकाळी मुलीच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबून तिचा जीव घेतला.
मयत मुलीचे नाव हुरेन आसीफ नाईक असून, तिच्या आईचे नाव शाहीन आसीफ नाईक (वय 36) आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आईला ताब्यात घेतले. मृतदेह नंतर रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.
सुरुवातीच्या तपासानुसार, रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील या तरुणीचा विवाह चिपळूणजवळील गावातील तरुणासोबत झाला होता. दाम्पत्याला आधीच चार वर्षांची मुलगी आहे. सध्या पती कामानिमित्त परदेशात असल्यामुळे महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती. तिच्यावर मानसिक आजारांचे उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बुधवारी सायंकाळी, तिची बहीण बाहेर गेली असताना, शाहीन नाईकने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात बोळा कोंबून हत्या केली. शेजारचे नातेवाईक काही कामानिनित्त घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी संशयित आईला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आईने हे कृत्य का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही. ही दुर्दैवी घटना कुटुंबांमध्ये शोककळा पसरवणारी ठरली आहे. तसेच या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी तालुक्यासह शहरात खळबळ उडाली आहे.

