(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा, मालगुंड नं. १, सध्या आपल्या “शतकोत्तर अमृत महोत्सवी” वर्षात प्रवेश करत आहे. दि. ५ ऑगस्ट २०२५ ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा उत्सव साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त शतकोत्तर अमृत महोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ एकत्र येत विविध सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या व्हाव्यात आणि माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या सहवासात रमण्याची संधी मिळावी, या उद्देशाने “एक शनिवार – शाळेसाठी, शाळेमध्ये” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही संकल्पना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे आणली आहे.
या उपक्रमाअंतर्गत शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या विविध बॅच एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देतील. यावेळी तत्कालीन माजी शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक शनिवारी दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शाळा माजी विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात येणार आहे.
यावेळी शतकोत्तर अमृत महोत्सव समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेच्या कार्याबाबत तसेच आगामी कार्यक्रमांबाबत माहिती देतील. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार, सूचना व उपक्रमांचे नियोजन समितीसमोर मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी पुढील सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे –
डॉ. संतोष केळकर : ९९७५७ २६२०२
श्री विलास राणे : ८७८८३ ६०५२५
सौ. शुभदा मुळ्ये : ७०६६९ २६३०१
श्री गिरीश बापट : ७८७५९ २८६३०
श्री विशाल लिंगायत : ७६६६३ २३३२९

