(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी-देवरुख मार्गावर सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेत रत्नागिरीहून सुटणारी सायंकाळी ७.३० वाजताची बस वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केली जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बसचे सर्व प्रवासी त्यानंतरच्या रात्री ८ वाजताच्या अखेरच्या बसमध्ये कोंबले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
देवरुखसह मार्गावरील विविध गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, ७.३० वाजताची नियोजित फेरी अचानक रद्द केल्यानंतर लांब पल्ल्याचे प्रवासी आणि स्थानिक प्रवासी या दोघांनाही अखेरच्या बसवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, एका बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढवले जात असून बसमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा राहत नाही. उभे राहण्यासाठीही जागा नसल्याने अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेषतः महिलां, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या प्रचंड गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या गैरसोयीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. अवाजवी गर्दीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. “प्रवाशांना मेंढरांसारखे कोंबून वाहतूक करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” अशी तीव्र प्रतिक्रिया नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा बसस्थानकावर तासन्तास प्रतीक्षा करूनही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नसल्याने प्रवाशांचा रोष वाढत आहे.
दरम्यान, प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये सायंकाळी ७.३० वाजताची नियोजित बस कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये, शेवटच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे थांबवावे, तसेच देवरुख आणि मार्गावरील स्थानिक प्रवाशांसाठी स्वतंत्र व योग्य नियोजन करावे, अशा मागण्यांचा समावेश आहे. रत्नागिरी-देवरुख मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एसटी प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

