(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने अक्षरशः हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना रविवारी पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला. रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या हापूस आंबा व्यवसायासमोर नव्या संकटाची चाहूल लागली आहे.
गेल्या पंधरवड्यापासून कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट जाणवत होती. वाढते तापमान, अंगाची लाही लाही करणारा उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशात रविवारी पहाटे अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असून शहरासह ग्रामीण भागात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यंदा अश्विनी आणि कार्तिकी नक्षत्रात पावसाची सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पारंपरिक कृषी गणितांनुसार या नक्षत्रांतील पाऊस आगामी खरीप हंगामासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे बळीराजाने आता शेतीपूर्व कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातून यंदाचा पावसाळा समाधानकारक आणि शेतीला पोषक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
मात्र, दुसरीकडे या पावसाने हापूस आंबा उत्पादकांची चिंता वाढवली आहे. सध्या आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून अनेक बागांमध्ये अजूनही आंबे झाडांवर आहेत. काही ठिकाणी काढणी आणि बाजारपेठेत पाठवण्याची तयारी सुरू असतानाच झालेल्या पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. झाडावरील आंब्यांवर डाग पडणे, काढणी केलेला आंबा ओलाव्यामुळे खराब होणे, तसेच वाहतूक आणि पॅकिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच विविध नैसर्गिक आणि बाजारपेठीय संकटांचा सामना करणाऱ्या आंबा उत्पादकांसाठी हा पाऊस डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
संततधार पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, काही ठिकाणी अल्पकाळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कृषी विभागाने आंबा उत्पादकांना मालाची योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.

