(राजापूर)
अधिक मासानिमित्त राजापूर तालुक्यातील श्री देव धुतपापेश्वर मंदिर येथे ब्रह्मवृंदांच्या पुढाकाराने महारुद्र सेवा भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडली. वेदघोष, मंत्रोच्चार आणि विधीवत पूजा-अभिषेकाने मंदिर परिसर शिवमय झाला होता.
महारुद्र सेवेची सुरुवात सकाळी धार्मिक विधींनी करण्यात आली. ब्रह्मवृंदांनी वैदिक मंत्रोच्चारात भगवान शंकराचा रुद्राभिषेक करून विशेष पूजा केली. यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
दुपारी महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.
अधिक मासानिमित्त देवसेवा, धार्मिक परंपरांचे जतन तसेच समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी ब्रह्मवृंद आणि मंदिर समितीचे कौतुक केले.

