(रत्नागिरी / वार्ताहर)
शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने कलाक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘कला सन्मान सोहळा’ शनिवारी, २४ मे २०२५ रोजी रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात राज्यस्तरीय जीवनगौरव आणि कला गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कोकणातील प्रसिद्ध छायाचित्रकार आणि ‘चौगुले फोटो’ चे मालक गुरु चौगुले यांना यंदाचा ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गुरु चौगुले हे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे कार्याध्यक्ष असून, गेल्या अनेक वर्षांपासून छायाचित्रण क्षेत्रात ते सक्रीय योगदान देत आहेत. त्यांनी फोटोग्राफर्ससाठी मोफत वेबिनार्स आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. तसेच छायाचित्रकारांच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
गुरु चौगुले यांनी चित्रित केलेल्या अनेक लघुपटांना विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले असून, त्यांना याआधीही ‘आदर्श छायाचित्रकार’ यासारखी प्रतिष्ठेची पारितोषिके मिळाली आहेत. ते विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रीय असून, कोकणातील तरुणांना नाट्य, सिनेमा व मॉडेलिंग क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
स्थानिक बाजारपेठेला चालना देणे, युवकांमध्ये रोजगारनिर्मिती घडवून आणणे, तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभाग यामुळे त्यांचे कार्य अधिकच उल्लेखनीय ठरते. या सर्व कार्याची दखल घेत शिवस्वराज्य फाउंडेशनतर्फे त्यांना राज्यस्तरीय ‘कला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार समारंभास कला, नाट्य, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला.

