(रत्नागिरी)
संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र तथा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी बोलताना सांगितले की, युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर आणि आर्थिक अस्थिरतेमुळे अर्थविश्वासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा काळात राज्यातील सुमारे १९ हजार पतसंस्थांना सक्षम नेतृत्व आणि योग्य मार्गदर्शन मिळाले असून ॲड. दीपक पटवर्धन यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ.शिंगी, महासचिव श्री.राजोबा सर, ज्येष्ठ संचालक श्री.दादाराव तुपकर यांचेसह पतसंस्था फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्रजी चव्हाण, आमदार किरणजी सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीणजी दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उदयजी जोशी, आमदार प्रसादजी लाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

