(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या २००५ पासून ग्रामस्थ अशोक नारकर यांच्या घरात भाडेतत्त्वावर सुरू आहे. या आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला एप्रिल २०२४ मध्ये सुरुवात झाली असली तरी आजतागायत काम पूर्ण झालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज सुमारे ४५ ते ५० रुग्णांची ओपीडी होत असून पाचल, करक, कारवली, येरडवं, पांगरी, मूर, काजिर्डा आणि कोळंब या गावांतील नागरिक येथे आरोग्यसेवेचा लाभ घेतात. केंद्रात सध्या दहा कर्मचारी कार्यरत असून आणखी पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
या आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी तिच्यासाठी स्वतंत्र जागा किंवा शेड नसल्याने ती रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पार्क करण्यात आली आहे. आरोग्य केंद्र सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असते. आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी तत्काळ सेवा देतात, मात्र राहण्याची सुविधा नसल्याने एकही कर्मचारी तेथे मुक्काम करू शकत नाही.
दरम्यान, नव्या इमारतीच्या तळमजल्याचे बांधकाम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी किमान तळमजल्याचे काम पूर्ण होऊन आरोग्य केंद्राचे स्थलांतर होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. सुरुवातीला या इमारतीसाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आणखी ७० ते ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे समजते. तरीही बांधकाम रखडल्याने ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेली २३ वर्षे हे आरोग्य केंद्र भाड्याच्या घरात सुरू असून जागेच्या गैरसोयीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशोक नारकर यांच्या घरातील इमारतही आता पूर्णपणे जीर्ण आणि नादुरुस्त झालेली दिसून येत आहे.
आरोग्य केंद्राचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्थानिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते नारायण पांचाळ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर नव्या इमारतीत सुरू होऊन परिसरातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे त्यांनी सांगितले.
तसेच प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदाराकडून बांधकाम वेळेत पूर्ण करून घ्यावे आणि नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “जर पुढील दोन वर्षांतही ही इमारत पूर्ण झाली नाही, तर आरोग्य केंद्राच्या रखडलेल्या कामाचा ‘रौप्यमहोत्सव’ सरकारनेच साजरा करावा,” असा उपरोधिक टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.

