(पाली / वार्ताहर)
पाली ग्रामपंचायतीअंतर्गत पाली बाजारपेठ आणि देवतळे परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत केवळ एकदाच पाणीपुरवठा करण्यात आला असून, तोही आता पुन्हा बंद झाला आहे.
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही पाणीपुरवठा योजना आणि पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
संबंधित ठेकेदाराने पाईपलाईनचे काम दर्जाहीन पद्धतीने केल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी पाली बाजारपेठ आणि देवतळे भागातील रहिवाशांना पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाणी मिळाले असून पुन्हा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित बेजबाबदार ठेकेदारावर ग्रामपंचायतीने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

