(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तहसीलदार कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले प्रविण भूपाल कांबळे (वय ४९) यांचे गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने महसूल विभागातील सहकारी आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
प्रविण कांबळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील रहिवासी होते. त्यांनी २० डिसेंबर २०१३ रोजी महसूल विभागातील सेवेला सुरुवात केली होती. शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सन २०१७ पासून ते राजापूर तहसीलदार कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून राजापूर येथे सेवा बजावताना ते महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळत होते.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.


