(मंडणगड / वार्ताहर)
घरात एकट्या असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात शिरून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केल्याची घटना मंडणगड तालुक्यातील भामघर येथे घडली. गुरुवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शशिकला बोर्ले असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्यांच्या प्रतिकारामुळे झालेल्या झटापटीत दागिने तुटले. त्यातील चोरट्याच्या हाती लागलेले दागिने घेऊन त्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला बोर्ले या घरी एकट्याच असताना तोंडाला मास्क लावलेला एक अनोळखी इसम चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात शिरला. त्याने अचानक बोर्ले यांच्या तोंडावर रुमाल टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्ध महिलेने प्रतिकार केल्याने दोघांमध्ये झटापट झाली. यामध्ये गळ्यातील दागिने तुटले. त्यातील काही दागिने हातात घेऊन चोरट्याने गोठे गावाच्या दिशेने असलेल्या जंगलातून पळ काढला.
चोरट्याच्या या कृत्यानंतर शशिकला बोर्ले यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, गेल्या महिनाभरात मंडणगड तालुक्यात वृद्ध महिला, लहान मुली आणि महिलांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. संबंधितांची रेकी करणे, त्यांना घाबरवून लूटमार करणे अशा घटनांमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून वारंवार सतर्क राहण्याचे आवाहन केले जात असतानाही अशा प्रकारांना आळा बसत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेषतः निर्जन ठिकाणी आणि एकांतात असलेल्या घरांनाही चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे भामघर येथील घटनेतून समोर आले आहे. यापूर्वी घडलेल्या काही गुन्ह्यांच्या तपासातील प्रगतीबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भामघर येथील घटनेचा सखोल तपास करून संबंधित आरोपीला तातडीने अटक करावी, तसेच तालुक्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


