(मुंबई/ वृत्तसंस्था)
महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी उमेदवाराला मासिक पाळी सुरू असल्यास संबंधित उमेदवाराला चाचणीसाठी पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी याबाबत माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक तरुणी वर्षभर कठोर परिश्रम घेत असतात. मैदानी चाचणीतील यशासाठी पहाटेपासून धावण्याचा सराव, शारीरिक व्यायाम आणि विविध प्रकारच्या तयारीवर त्यांचा भर असतो. मात्र, प्रत्यक्ष शारीरिक चाचणीच्या दिवशीच मासिक पाळी सुरू झाल्यास त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी, वर्षभर केलेल्या मेहनतीनंतरही भरतीची संधी गमावण्याची भीती अनेक उमेदवारांना सतावत होती.
मासिक पाळीच्या काळात काही तरुणींना तीव्र पोटदुखी, हात-पायांत गोळे येणे, चक्कर येणे आणि अशक्तपणा अशा शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत १०० मीटर आणि ८०० मीटर धावणे, गोळाफेक तसेच लांबउडी यांसारख्या कठीण शारीरिक चाचण्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करणे अवघड ठरू शकते. त्यामुळे शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांमध्ये भरतीची संधी हुकण्याची चिंता असते.
ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने महिला पोलीस भरती प्रक्रियेत संबंधित तरुणींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मासिक पाळी सुरू असलेल्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणी पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणींनी स्वागत केले आहे. मासिक पाळीमुळे शारीरिक चाचणीच्या दिवशी अपेक्षित कामगिरी करता येत नसल्याने भरतीची संधी गमावण्याची वेळ येऊ शकते. मात्र, नव्या निर्णयामुळे अशा उमेदवारांना आपली क्षमता दाखवण्याची अतिरिक्त संधी मिळणार असल्याची भावना तरुणींनी व्यक्त केली आहे.
महिला उमेदवारांच्या भरतीच्या संधीवर होऊ नये, या दृष्टीने सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होणार, आरोग्य तपासणीसाठी कोणते निकष निश्चित केले जाणार आणि यासंदर्भातील अधिकृत नियमावली कधी जाहीर होणार, याकडे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.


