(मुंबई)
उसने दिलेल्या पैशांच्या वादातून मुंबईतील शिवडी परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेत आरोपीने स्क्रू ड्रायव्हरने तरुणाच्या मानेवर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, मुख्य आरोपीसह आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
मिनर्व्हा कंपाऊंड परिसरात भरदिवसा थरार
ही घटना गुरुवारी (22 मे) दुपारी शिवडीतील मिनर्व्हा कंपाऊंड परिसरात घडली. तक्रारदार खालिद रमजान हाश्मी हे सुक्या माशांचा व्यवसाय करतात. ते आपल्या मित्रांसोबत स्टॉलसमोर बसून जेवण करत असताना आरोपी जसीम सय्यद आणि समीर नासिर शेख यांच्यात उसने दिलेल्या पैशांवरून वाद सुरू झाला.
सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही क्षणांतच हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. संतापलेल्या जसीम सय्यदने आपल्या स्कूटरमधून स्क्रू ड्रायव्हर काढून समीर शेखच्या मानेवर वारंवार हल्ला केला. यावेळी त्याच्या काही साथीदारांनीही त्याला मदत केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण
मानेवर गंभीर वार झाल्याने समीर शेख घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. उपस्थित नागरिक आणि तक्रारदारांनी त्याला तातडीने मुंबईतील KEM रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एका आरोपीला अटक, दोघे फरार
या प्रकरणी खालिद हाश्मी यांच्या तक्रारीवरून शिवडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी ‘कफ परेड’ परिसरातील गणेश मूर्ती नगर येथे राहणाऱ्या किसान जयदीप या आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी जसीम सय्यद आणि त्याचा साथीदार रिझवान समीर शेख हे सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे शिवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

