(ठाणे)
घटस्फोट देण्यास नकार देणाऱ्या पतीचा पत्नीने कट रचून जंगलात खून केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात उघड झाली आहे. चेरपोली गावाजवळ 17 नोव्हेंबर रोजी हा गुन्हा घडला होता. तपासाच्या धागेदोरे हातात लागल्यानंतर ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांनी पत्नी हसीना मेहबुब शेख आणि तिच्या तीन साथीदारांना 4 डिसेंबर रोजी अटक केली आहे. मृत पती तिपण्णा हा मूळ कर्नाटकातील असून पत्नीपासून विभक्त राहत होता.
मुंबई–नाशिक महामार्गालगत चेरपोली जंगल परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक कुजलेला मृतदेह 25 नोव्हेंबर रोजी आढळला होता. पोलिसांनी प्रथमतः हा गुन्हा नोंदवत या बाबत तपास आणि चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यात आला.
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, हसीनाचा पती तिपण्णाशी सतत घरगुती वाद सुरू होता. हसीना घटस्फोटासाठी दबाव टाकत असताना तिपण्णा मात्र यास नकार देत होता. त्यामुळे हसीनाने पतीचा खून करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले.
17 नोव्हेंबरला हसीनाच्या सांगण्यावरून रिक्षाचालक फैयाज जाकीर हुसेन शेख (35) याने आणखी दोन साथीदार सिकंदर बादशहा मुजावर (35) आणि गुलाम अकबर इक्तीयार मौलवी (38) यांच्यासह तिपण्णाला काहीतरी बहाण्याने रिक्षात बसवले. त्यानंतर तिघांनी त्याला चेरपोलीजवळील जंगलात नेऊन हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या पथकाने संशयित फैयाजसह तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता गुन्ह्याची पूर्ण कबुली मिळाली. पतीचा खून हसीनाच्या सांगण्यावरूनच करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी दिली. अधिक तपास शहापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे करत आहेत.

