(नवी दिल्ली)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तब्बल पाच राज्यांमध्ये विकली गेल्याचे उघड झाले असून, सर्वाधिक व्यवहार महाराष्ट्रात झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. राजस्थान, हरियाणा यांसह इतर राज्यांमध्येही पेपरफुटीचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे.
सीबीआयने अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि जप्त डिजिटल उपकरणांची तपासणी केल्यानंतर हा मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात पुण्यातील मनिषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आली असून, भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिका फुटीमध्ये तिचा थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर अटक आरोपींची संख्या 11 वर पोहोचली असून, त्यापैकी 7 आरोपी महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्र बनला पेपरफुटीचा केंद्रबिंदू
सीबीआयच्या तपासात महाराष्ट्र हे पेपरफुटीचे सर्वात मोठे केंद्र असल्याचे समोर आले आहे. येथूनच प्रश्नपत्रिका राजस्थान आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रश्नपत्रिका छापून विक्री केल्याचे पुरावेही सीबीआयच्या हाती लागले आहेत.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फुटलेली प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असण्याची शक्यता आहे. काही कुटुंबीयांनी ही प्रश्नपत्रिका इतरांना पुन्हा विकल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पेपर खरेदीसाठी पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
धनदांडगे पालकही तपास यंत्रणांच्या निशाण्यावर
या प्रकरणात केवळ दलाल आणि सूत्रधारच नव्हे, तर प्रश्नपत्रिका खरेदीसाठी मोठी रक्कम मोजणारे धनदांडगे पालकही आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. तपास यंत्रणेनुसार, शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि त्यांची साथीदार मनीषा वाघमारे यांच्या खात्यांमध्ये ज्या पालकांच्या बँक खात्यांद्वारे पैसे हस्तांतरित झाले, त्या सर्वांची आर्थिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद व्यवहारांची माहिती गोळा करून संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लातूरमध्ये डॉक्टरांच्या ठिकाणी झाडाझडती
पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाचा विस्तार आता महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत पोहोचला आहे. लातूरमध्ये दोन डॉक्टरांच्या ठिकाणी सीबीआयने झाडाझडती घेतली असून, अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासासाठी जप्त करण्यात आली आहेत.
NTA बाहेरील व्यक्तींचाही शोध सुरू
सीबीआयच्या तपासात राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) बाहेरील काही व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी दोन विशेष पथके काम करत आहेत. तपास यंत्रणेनुसार, पेपरफुटी रॅकेटचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी अजूनही चौकशी आणि अटकसत्र सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

