(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पूर्वी झालेल्या वादाचा आणि पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील आरे बसणी येथे १५ मे रोजी रात्री घडली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी प्रतीक्षा प्रकाश कदम (वय ५८, रा. आरे बसणी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साहिल राम शिवलकर, सागर राम शिवलकर, अस्मि अक्षय शिवलकर आणि राम दत्ताराम शिवलकर (सर्व रा. आरे बसणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रतीक्षा कदम या १५ मे रोजी रात्री घराच्या पाठीमागील जागेत भांडी धुत होत्या. त्यावेळी शेजारी राहणारे साहिल आणि सागर शिवलकर तेथे आले आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुझा मुलगा पंकज याला बाहेर काढ, त्याला ठार मारायचे आहे,” अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या प्रतीक्षा कदम घरात जाण्याचा प्रयत्न करत असताना दरवाजा लावताना झालेल्या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चैन तुटल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घराबाहेर सुरू असलेला गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून प्रतीक्षा यांचे पती प्रकाश कदम आणि मुलगा पंकज यांनी घराचा पुढील दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर गैरतक्रारदार अस्मि आणि राम शिवलकर यांनीही घराबाहेरून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामागे मागील वर्षी घडलेल्या एका जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पंकज कदम हा मित्रासह आरे ब्रिज परिसरात ‘काळवं’ काढण्यासाठी गेला असताना साहिल आणि समीर शिवलकर यांच्याशी त्याचा वाद झाला होता. त्या घटनेप्रकरणी पंकजने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच तक्रारीचा राग मनात धरून शिवलकर कुटुंबीयांनी कदम कुटुंबाला धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार शिवलकर यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महाडिक पुढील तपास करत आहेत.

