(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक पर्यटन दिनी एमटीडीसी कडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे ( भाप्रसे) यांच्या प्रमुख उपस्थितीत कातळशिल्प सहल या नवोप्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. गणपतीपुळे येथील पर्यटक निवासात 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोकणातील दुर्लक्षित असलेल्या कातळशिल्प जतन संवर्धन व त्याची पर्यटकांना प्रचिती देणे व प्रवास अनुभवण्यासाठी कातळशिल्प सहल या नवोप्रकल्पाची घोषणा जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना अतिप्राचीन कातळ शिल्पांबाबत माहिती मिळून यातून स्थानिक रोजगार निर्मितीला हातभार लागेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
गणपतीपुळे येथील पर्यटक निवासात जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने शाळकरी मुलांची पर्यटन दिंडी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फार्म व्हिजीट, पक्षी निरीक्षण टूर आणि बीच स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम पर्यटन सप्ताहामध्ये व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे( भाप्रसे) यांच्या व्यवस्थापनाखाली व महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याची माहिती एमटीडीसी चे कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने यांनी दिली.

