(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबवलेल्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सातत्यपूर्ण जनजागृती आणि कीटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेमुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यूचे अवघे तीन रुग्ण आढळले असून, गतवर्षी २०२५ मध्ये वर्षभरात ४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
डेंग्यू हा एडिस जातीच्या मादी डासांपासून पसरणारा विषाणूजन्य आजार असून, डासांची उत्पत्ती रोखणे हा त्यावरील सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जातो. विशेषतः साचलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. डासांच्या अळ्यांची निर्मिती रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थळांमध्ये गप्पी मासे सोडणे, शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवणे, साचलेली गटारे वाहती करणे तसेच पावसाळ्यात निर्माण होणारी डबकी बुजवणे, अशा विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून वर्षभर राबवण्यात येणाऱ्या कीटकजन्य रोग नियंत्रण मोहिमा, सर्वेक्षण आणि जनजागृतीमुळे ही सकारात्मक स्थिती निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

