(मुंबई)
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून गृह विभागाने ३१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये चार अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह २७ पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधीक्षकाला अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढतीही देण्यात आली आहे. गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी २१ मे रोजी या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त स्तरावरील महत्त्वाच्या बदल्या
शिवाजी राठोड यांची नागपूरहून ठाणे येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे यांची नवी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या विनिता साहू यांची मुंबई राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेले अशोक दुधे यांची ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. तसेच बिनतारी संदेश विभागातील अधिकारी आर राजा यांना बढती देत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.
ठाणे, पुणे, मुंबईसह अनेक शहरांमध्ये फेरबदल
ठाण्याचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची राज्य पोलीस निरीक्षक कक्षात बदली करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक संभाजी कदम यांची पुणे दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती झाली आहे. नाशिक पोलीस अकादमीतील अधिकारी अकबर पठाण यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर विवेक पाटील यांची पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची ठाणे येथे, तर शिवाजी पवार यांची पुणे महामार्ग सुरक्षा पथकात बदली करण्यात आली आहे.
बीड, परभणी, मिरा-भाईंदरमध्येही बदल्या
राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे. अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. तर डायल ११२ विभागाचे अधिकारी तानाजी चिखले यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे.
सर्व अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश
या बदल्यांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर आणि इतर महत्त्वाच्या विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

