(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून झाल्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या संशयित हाजिरा मुसा माखजनकर (वय ७२, रा. कडवई) यांना रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे माखजनकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कडवई येथील बानू फकीर मोहम्मद जवळे यांच्या खुनाचा गुन्हा संगमेश्वर पोलिस ठाण्यात मे महिन्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी हाजिरा माखजनकर, रिजवान महामुद जुवळे आणि हुमायु शकील काझी (रा. संगमेश्वर) या तिघांविरुद्ध खुनाचा आरोप ठेवला आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, २ मे २०२५ रोजी संशयितांनी बानू जवळे यांचे सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण करून त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कडवई–कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यालगतच्या जंगलमय खिंडीत फेकून देण्यात आला होता.
या प्रकरणी अटक झालेल्या हाजिरा माखजनकर यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने उपमुख्य लोकअभिरक्षक अॅड. उन्मेष मुळे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, हाजिरा या वयोवृद्ध महिला असून त्यांचा या गुन्ह्याशी थेट संबंध नाही. त्यांच्या विरोधात कोणताही ठोस वा प्रथमदर्शनी पुरावा नाही. पोलिसांचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे, त्यामुळे त्या पळून जाण्याची शक्यता नाही, तसेच न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करतील, असा युक्तिवाद त्यांनी मांडला.
दरम्यान, सरकारी पक्षाने मात्र जामिनास तीव्र विरोध दर्शविताना म्हटले की, आरोपींनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. आरोपी व फिर्यादी हे एकाच गावातील असल्याने हाजिरा माखजनकर साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, अशी भीती सरकारी पक्षाने व्यक्त केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार मलिकार्जुन अंबाळकर यांनी हाजिरा माखजनकर यांना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

