(मावळ / पुणे)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आज (सोमवारी) पहाटे मुसळधार पावसामुळे अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. पाटण गावात डोंगरकड्याचा मोठा भाग अचानक कोसळून घरांवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेत नंदू दत्तू तिकोने (५५), अनिता नंदू तिकोने (५०) आणि ज्ञानेश्वर नंदू तिकोने (२६) यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कुटुंबीयांना बचावाची संधीही मिळाली नाही.
NDRFसह बचाव पथकांचे युद्धपातळीवर मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), शिवदुर्ग रेस्क्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत मलबा हटविण्याचे काम सुरू केले.
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे येथील NDRFच्या पाचव्या बटालियनचे ३० सदस्यांचे विशेष पथक निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ५.५० वाजता घटनास्थळी रवाना करण्यात आले.
दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याचा समन्वय साधला.
स्थानिक आमदार सुनील शेळके यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बचावकार्य अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आणखी दरडी कोसळण्याचा धोका
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील डोंगरमाथे अजूनही धोकादायक बनले आहेत. डोंगराच्या उतारावरील आणखी काही भाग खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कुटुंबांनी घरे तात्पुरती रिकामी करून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
प्रशासनाने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आवश्यकतेनुसार आणखी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे दुर्घटना
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे मातीचा आधार कमकुवत होऊन डोंगरकडा खचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पाटण गावातील या भीषण दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

