(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि कशेडी घाटातील दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याचा आढावा घेत समन्वयाची प्रभावी सूत्रे हाताळली. संवेदनशील भागांना दिलेल्या भेटी, विविध यंत्रणांशी साधलेला समन्वय आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेल्या तत्पर प्रयत्नांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा प्रत्यय आल्याची भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम असताना पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. पूरबाधित परिसर, नदीकाठची गावे आणि संवेदनशील ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून मदतकार्याचा वेग वाढविण्याबरोबरच स्थानिक पोलीस अधिकारी, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. दरम्यान, कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरड हटविण्याचे काम, वाहतुकीचे नियोजन आणि अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर त्यांनी स्वतः लक्ष केंद्रित केले. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले.
संकटाच्या काळात केवळ प्रशासकीय आदेशांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा वेध घेण्याची त्यांची कार्यपद्धती पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरत असते. संकटसमयी तातडीने निर्णय घेणे, यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता पूर आलेले रस्ते, पूल किंवा ओढे पार करू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ किंवा रत्नसेतु चॅटबॉटवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
संकटाच्या काळात एसपी नितीन बगाटे प्रत्यक्ष मैदानात
रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी उद्भवलेल्या विविध आपत्कालीन परिस्थितींमध्येही पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामकाजाला गती दिली होती. नैसर्गिक आपत्ती, निवळी अपघात, गणपतीपुळे दुर्घटना, किंवा कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न असोत, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याची त्यांची कार्यपद्धती सातत्याने दिसून आली आहे. त्यामुळे संकटसमयी प्रत्यक्ष नेतृत्व करणारे अधिकारी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणे, निर्णय प्रक्रियेला गती देणे आणि अधीनस्थ अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावणे, ही पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात. याच कार्यपद्धतीमुळे त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी छाप उमटवली आहे. संकटाच्या काळात प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची त्यांची कार्यपद्धती रत्नागिरी जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय सातत्याने ठरत आहे.

