(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन बस थांब्याजवळ आज सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत पाच जण जखमी झाले. ही घटना सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच १४ बीटी २७५३) खडीकोळवण ते साखरपा मार्गावर चालवत होते. आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ बस आली असता समोरून येणारी एर्टिका कार (एमएच ११ डीझेड ०३२९) यांच्यात जोरदार धडक झाली. एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे रत्नागिरीहून साताऱ्याकडे जात होते.
या अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे, एसटी प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खडीकोळवण), एर्टिका चालक संतोष पवार, शंभुराज शिवाजी पवार (वय १३, रा. रामनगर, सातारा) तसेच श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) हे जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील आणि महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

