(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगतच्या मिऱ्या गावात आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास एका मच्छिमारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर असे जखमी मच्छिमाराचे नाव असून, त्यांच्या मच्छिमार बोटीवरच अज्ञातांनी धारदार शस्त्राने तब्बल नऊ वार केल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र नार्वेकर हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या मच्छिमार बोटीवर काम करत असताना अचानक काही जणांनी बोटीवर येत त्यांच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने शरीरावर सपासप वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या हल्ल्यामागे काही दिवसांपूर्वी Bhatye-Mirya परिसरात शिमगोत्सवाच्या निमित्ताने उद्भवलेला रांगोळीचा वाद कारणीभूत असावा, अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. श्री नवलाई-पावणाईच्या पालखी स्वागतासाठी रांगोळी काढत असताना दोन गटांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्या वेळी हा वाद चिघळत सुमारे १०० ते १५० लोकांचा जमाव आमनेसामने आला होता. मध्यस्थीमुळे तो वाद निवळला असला, तरी त्याचाच वचपा काढण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हल्ला नेमका कोणी केला आणि त्यामागे किती जणांचा सहभाग आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर मिऱ्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

