(खेड / वार्ताहर)
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला आहे. खेड तालुक्यातील कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली.
दरडीसोबत मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.


