(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील वाळू वाहतुकीतील वर्चस्वाच्या वादातून भरदिवसा डंपर चालकाला रोखत बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात घडली. करजुवे–माखजन मार्गावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद एकनाथ साळुंखे (वय २५, रा. चिखली साळुंखेवाडी) हे व्यवसायाने डंपर चालक आहेत. बुधवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी ११.३० च्या सुमारास ते करजुवे येथून एम. एच. ०८/ए.पी./६५३४ या डंपरमध्ये वाळू भरून कडवईकडे निघाले होते. दरम्यान, करजुवे गावाजवळ आरोपी सूरज उदय नलावडे (वय २६, रा. करजुवे वातवाडी) याने त्यांचा डंपर अडवला. सुरज नलावडे हा दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार स्पष्ट होते. चावी मागितल्यावर साळुंखे यांनी कारण विचारत नकार दिल्याने नलावडे संतापला. त्याने तातडीने आपल्या ग्रे रंगाच्या स्वीफ्ट डिझायरला डंपरसमोर आडवे उभे केले आणि रस्ता पूर्णपणे जाम केला. यानंतर तो गाडीतून खाली उतरला तेव्हा त्याच्या हातात एक सिंगल बॅरल बंदूक असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. त्याने बंदुकीचा धाक दाखवत डंपरचा दरवाजा उघडला आणि जबरदस्तीने चावी हिसकावून घेतली. “दम असेल तर माझ्या घरातून चावी घेऊन जा,” अशा शिवीगाळ व धमकी देत आरोपी तेथून पसार झाला.
या प्रसंगानंतर घाबरलेल्या अवस्थेत हर्षद साळुंखे यांनी माखजन पोलीस दूरक्षेत्रात धाव घेत तक्रार नोंदवली. तत्परतेने तपास सुरू करत पोलिसांनी अकर्सन्स क्रमांक ६१/२०२५ नुसार गु.आर.क्र. १३३/२०२५ दाखल केला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६(२), ३५२ तसेच भारतीय हत्यार कायद्याचे कलम ३/२५ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, तक्रार नोंद प्रक्रिया संध्याकाळी ६ वाजता पूर्ण झाली. घटनेनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक आणि त्यासोबत होणारे संघर्ष या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
अवैध वाळू वाहतुकीच्या साखळ्यांना स्थानिक स्तरावर राजकीय पाठबळ
अशा घटनांनी कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतेच; पण स्थानिक पोलिस यंत्रणेची प्रतिबंधक भूमिका किती प्रभावी आहे, याचे गंभीर मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. कायद्याचा धाक म्हणजे केवळ गुन्हा नोंदवणे नव्हे, तर गुन्हा घडूच न देण्याची क्षमता. स्थानिक पातळीवर गुन्हेगारांचे उन्मत्त वर्तन, अवैध वाळूव्यवसायातील गंडाळे, आणि त्यातून उफाळणारे संघर्ष सातत्याने दिसत असतील तर पोलिसांची उपस्थिती किती जाणवते, हा मूलभूत प्रश्न समाजाला पडणे साहजिकच आहे. आज परिस्थिती अशी की अवैध वाळू वाहतुकीच्या साखळ्यांना स्थानिक स्तरावर राजकीय पाठबळ, आर्थिक स्वार्थ आणि दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा जनमानसात आहे. त्यात पोलिसांचा धाक कमी पडू लागला तर सामान्य नागरिकांच्या मनातील विश्वास आणखी ढळू शकतो.
धोरणात्मक आणि कडक पावले उचलणे गरजेचे
कायद्याचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी केवळ प्रकरणे नोंदविण्यापुरते न थांबता अशा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुळावर घाव घालणारी धोरणात्मक आणि कडक पावले उचलणे गरजेचे आहे. कारण नागरिक सुरक्षित नसतील, तर प्रशासनाची ताकद ही केवळ कागदोपत्री औपचारिकता ठरेल. सध्याच्या घटनेने स्थानिक पोलिस यंत्रणेने आपल्या कार्यपद्धतीचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज अधोरेखित केली आहे.

