( रत्नागिरी / वार्ताहर )
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात उभारण्यात आलेल्या सुसज्ज पुस्तक दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण आणि फित कापून नव्याने उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे लोकार्पण करण्यात आले.
मराठी भाषा विभागाने या दालनासाठी एक हजाराहून अधिक दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. या संग्रहात चरित्रग्रंथ, ऐतिहासिक पुस्तके, बालसाहित्य, माहितीपर पुस्तके, कवितासंग्रह, लेखसंग्रह तसेच विविध विषयांवरील संदर्भग्रंथांचा समावेश आहे. या पुस्तकांचा लाभ लोकमान्य टिळक जन्मस्थळाला भेट देणारे पर्यटक, विद्यार्थी, संशोधक आणि साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की, हे पुस्तक दालन केवळ वाचनापुरते मर्यादित राहणार नाही. भविष्यात या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. तसेच पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच संशोधनात्मक अभ्यासक्रम, पत्रकारिता प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमही सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान हे केवळ ऐतिहासिक स्मारक नसून ते ज्ञान, विचार आणि प्रेरणेचे केंद्र बनावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थी, संशोधक आणि नव्या पिढीला दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
या पुस्तक दालनामुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, संशोधन करणारे अभ्यासक तसेच इतिहास आणि साहित्याची आवड असलेल्या वाचकांना मोठा लाभ होणार आहे. विशेषतः यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथ एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या अभ्यासाला मोठी मदत मिळणार आहे.
कार्यक्रमाला रत्नागिरी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका स्मिता पावसकर, वैभवी खेडेकर, प्रिती सुर्वे, पूजा पवार, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, राजेंद्र महाडीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात सुरू करण्यात आलेले हे पुस्तक दालन रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेला बळकटी देणारे ठरणार असून, भविष्यात या ठिकाणाला अभ्यास, संशोधन आणि मराठी साहित्याच्या संवर्धनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

