(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वेच्या जनरल डब्यात जागेच्या वादातून झालेल्या भांडणात एका प्रवाशावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० ते ११.२४ वाजण्याच्या सुमारास ट्रेन क्रमांक २२६५५ हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमधील रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
या प्रकरणी कोसलसिंग डागुर (३६ वर्षे), रा. गाव खिपकापुरा , ता. इंडोर, जि. करोली, राजस्थान यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी कोसलसिंग डागुर हे सदर ट्रेनच्या इंजिन बाजूच्या दुसऱ्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. रत्नागिरी स्थानकाजवळ गाडी थांबू लागल्यावर, संशयित आरोपी सागर सुरेश पवार (२७ वर्षे, रा. साखरीनाटे (खर्द), ता. जि. सनागिरी) याने सीटवर जागा न दिल्याच्या कारणावरून फिर्यादीवर रागाने शिवीगाळ केली. त्यानंतर छोट्या लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. तसेच या भांडणात त्यांना धमकावले.
या हल्ल्याप्रकरणी २४ एप्रिल रोजी दुपारी १.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, गु.र.नं. १६४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५१(२), ३५२ अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.