(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीच्या हवाई संपर्काच्या दृष्टीने रविवारी ऐतिहासिक घडामोड घडली. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात रत्नागिरी विमानतळ प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे प्रकल्पातील मोठा प्रशासकीय टप्पा पूर्ण झाला असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून पहिले विमान उड्डाण करण्याचे लक्ष्य असल्याची घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
रत्नागिरीतील सावंत पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सामंत यांनी सांगितले की, विमानतळ प्रकल्पाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही वेगाने सुरू आहेत. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

भूसंपादनासाठी स्वतंत्र निधी
विमानतळाच्या पुढील विस्तारासाठी आवश्यक भूसंपादनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी १० ते १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी विमानतळाला राज्यातील सर्वात आकर्षक आणि आधुनिक विमानतळ बनवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षभरात पंचतारांकित हॉटेलचे नियोजन
रत्नागिरीत पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी ‘ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचतारांकित हॉटेल समूहांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले. पुढील एका वर्षात अशा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय वन विभागाच्या जागेवर आधुनिक ॲडव्हेंचर पार्क उभारण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली. या पार्कमधील प्रमुख आकर्षण म्हणून ‘ट्री हाऊस रेस्टॉरंट’ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
महिला बचत गटांना मिळणार संधी
विमानतळ सुरू झाल्यानंतर स्थानिक महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विमानतळ परिसरात स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. यामुळे स्थानिक महिलांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हापूस आंबा, काजू आणि स्थानिक उद्योगांना फायदा
रत्नागिरी विमानतळ सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील हापूस आंबा, काजू, मत्स्य उत्पादने आणि इतर स्थानिक उत्पादनांची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जलद वाहतूक करणे अधिक सुलभ होईल. यामुळे निर्यात वाढण्यास मदत होऊन स्थानिक उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असेही डॉ. सामंत यांनी सांगितले.
“रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून अभिमान”
यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले,
“मी रायगडचा पालकमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प पुढे गेला आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना चिपी विमानतळ सुरू झाला. आता रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून येथील विमानतळ सुरू होत असल्याचा मला अभिमान आहे. रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
MADC ची भूमिका
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले की, विमानतळ सुरू झाल्यानंतर पर्यटनाबरोबरच स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल. त्यांनी सांगितले की, जागतिक अभ्यासानुसार एखादा विमानतळ यशस्वीपणे कार्यरत राहिल्यास त्या परिसराच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्याच्या धोरणानुसार रत्नागिरी विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावेल.
तटरक्षक दलाचे आवाहन
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक यांनी विमानतळ परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि पक्ष्यांमुळे विमानांना निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. लष्करी आणि नागरी विमान वाहतुकीसाठी सुरक्षित वातावरण राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, माजी आमदार विनय नातू, उद्योजक दीपक गद्रे, रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत पटवर्धन, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी केले, तर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आभार मानले.

