(खेड)
भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा कोकणातील प्रमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या खेड दौऱ्यानिमित्त जोरदार स्वागत करण्यात आले.
भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जठार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर शासकीय विश्रामगृह (डाक बंगला, खेड) येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रमोद जठार यांच्या विधान परिषद निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पक्ष नेतृत्वाने कोकणाला दिलेली ही मोठी संधी असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाई रेडीज, भाजपा अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, राजेश जोयसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे-शेट्ये, माजी नगरसेविका आशा सनगरे, प्रीती चिखले, माया गुहागरकर, मंदार आपटे, वैजेश सागवेकर, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, जयेश गुहागरकर, विजय गुप्ता, प्रणव मापुस्कर, स्वराज गांधी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात सामान्य कार्यकर्त्यालाही मोठी संधी मिळते. चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर वैभव खेडेकर हे राज्याचे किंवा देशाचे मोठे नेते का होऊ शकत नाहीत?” असे वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले. खेड शहरात मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधत होते. भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांच्या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
प्रमोद जठार म्हणाले, “वैभव खेडेकर यांना पाहून कुणालाही असे वाटण्याचे कारण नाही की त्यांच्यामागे पक्षाचे बळ नाही. पक्षाचे पूर्ण लक्ष त्यांच्याकडे आहे आणि लक्ष जावे अशीच ती व्यक्ती आहे. भाजपमध्ये कितीही पक्षप्रवेश झाले तरी वैभव खेडेकर यांना योग्य सन्मान देण्याचा निर्णय प्रदेश भाजप नेतृत्व तसेच देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे.” यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
राजकारणात संयम आणि निष्ठा महत्त्वाची असल्याचे सांगताना जठार म्हणाले, “राजकारणात वेळ आणि काळ महत्त्वाचा असतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. मला स्वतःला संधी मिळण्यासाठी तब्बल बारा वर्षे वाट पाहावी लागली. मात्र वैभव खेडेकर यांना इतकी प्रतीक्षा करावी लागेल असे वाटत नाही. कदाचित पुढील बारा महिन्यांतही त्यांना मोठी संधी मिळू शकते.”
प्रमोद जठार यांच्या या वक्तव्यानंतर खेडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून भाजपमध्ये वैभव खेडेकर यांच्या वाढत्या प्रभावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

