(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील मिरकरवाडा बंदर परिसरात वर्षानुवर्षे समुद्रात पडून राहिलेल्या जुन्या लाकडी नौकांच्या अवशेषांमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर अखेर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मलबारी, समीना आणि डिझेल जेटी परिसरात समुद्रात बुडालेल्या जुन्या नौकांचे अवशेष बाहेर काढण्याची मोहीम मंगळवारपासून हाती घेण्यात आली असून, बंदर परिसरातील मोडकळीस आलेल्या केबिन आणि डिंगींचीही लवकरच विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
मिरकरवाडा बंदरावर पर्ससीन नेटसह विविध प्रकारच्या मासेमारी नौका उभ्या करण्यासाठी अनेक जेटी कार्यरत आहेत. मात्र, मलबारी क्र. ४, समीना क्र. २ आणि डिझेल क्र. ३ या जेटी परिसरात वर्षानुवर्षे निष्क्रिय अवस्थेत उभ्या असलेल्या जुन्या लाकडी नौका कालांतराने फुटून त्यांचे अवशेष समुद्रात बुडाले होते. परिणामी, पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात इतर नौकांना सुरक्षितपणे शाकारून ठेवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
या पार्श्वभूमीवर सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी सोमवारी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत बुडालेल्या नौकांची माहिती संकलित केली. याचवेळी बंदर परिसरात ठेवण्यात आलेल्या मोडक्या केबिन हटवण्यासंदर्भातील नोटिसाही संबंधित ठिकाणी चिकटवण्यात आल्या. मंगळवारी मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने समुद्रात बुडालेल्या नौकांचे अवशेष बाहेर काढण्याची कारवाई सुरू केली. या मोहिमेदरम्यान बंदर प्राधिकरण अधिकारी अक्षया मयेकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाजावर नियंत्रण ठेवले.
दरम्यान, बंदर परिसरात दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेल्या काही चांगल्या स्थितीतील केबिन तसेच पर्ससीन नेट नौकांच्या डिंगी आणि छोट्या होड्या हटवण्यासाठी संबंधितांना काही दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त सावंत यांनी स्पष्ट केले. या मोहिमेमुळे मिरकरवाडा बंदर परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नौकांच्या वाहतुकीसाठी सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

