(साखरपा / भरत माने)
साखरपा व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून वारंवार होणाऱ्या खंडित वीजेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती कामे, पाणीपुरवठा, लघुउद्योग तसेच व्यापारी व्यवहारांवर याचा मोठा परिणाम होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात विजेअभावी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी महावितरणकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचे सांगितले. साखरपा परिसरातील वीज यंत्रणा तातडीने दुरुस्त करून सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून भांबेड 33 केव्ही लाईनमधील फॉल्ट शोधण्यात अडचणी येत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर देवरुख मुख्य लाईनचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने सध्या 11 केव्हीवर वीजपुरवठा केला जात आहे. मात्र या कमी क्षमतेच्या पुरवठ्यावर पंप, फ्रिज, पिठाच्या गिरण्या आणि अन्य व्यावसायिक आस्थापने चालविणे कठीण झाले आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाली लाईनचे काम काही ठिकाणी बाकी असून राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ते रखडले आहे. ही लाईन सुरू झाल्यास साखरपा परिसरातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात लोकप्रिय व कार्यतत्पर आमदार किरण (भैया) सामंत यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

