(ठाणे / कल्याण)
कल्याण पूर्व परिसरात माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली आहे. कचरा कुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले नवजात बाळ आढळल्याने खळबळ उडाली. कुत्र्यांचा घोळका त्या पिशवीभोवती जमलेला असतानाही एका स्थानिक महिलेच्या प्रसंगावधानामुळे बाळाचा जीव वाचला. चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा दाभेकर यांना अनेक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. अस्वस्थ झालेल्या पूजा यांनी तात्काळ जाऊन पाहिले असता झाडाखाली एका पिशवी आढळून आली.
सकाळच्या वेळी घडला धक्कादायक प्रकार
पूजा दाभेकर या कल्याण पूर्वेत वास्तव्यास असून शाळेत काम करतात. सकाळी कचरा टाकण्यासाठी जात असताना त्यांना पिंपळाच्या झाडाजवळील कचरा कुंडीजवळ संशयास्पद हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहिले असता एक प्लास्टिकची पिशवी हलताना दिसली आणि कुत्रे भुंकत असल्याचे त्यांनी लक्षात घेतले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पिशवी उचलली असता त्यात नवजात बाळ (मुलगी) असल्याचे समोर आले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले.
पूजा यांनी तात्काळ मुलीला पिशवीतून बाहेर काढले आणि घरी नेऊन आंघोळ घातली. त्यानंतर ती मुलगी झोपी गेली. सकाळ झाल्यानंतर पूजा यांनी ही माहिती स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर बालिकेला ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केले.
पोलिसांना तातडीने माहिती; बाळ रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर बाळाला ताब्यात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीत बाळाचे वय सुमारे सात दिवसांचे असल्याचे समोर आले आहे.
पोलीस तपास सुरू; सीसीटीव्ही फुटेज तपासणी
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात मुलीला कचऱ्यात फेकून देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपीचा शोध लागल्यानंतरच या अमानुष कृत्यामागील कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
‘बेटी बचाव’सारख्या मोहिमांनंतरही अशा घटना समोर येत असल्याने पुन्हा एकदा सामाजिक मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र स्थानिक महिलेच्या तत्परतेमुळे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचल्याने माणुसकीचे दर्शनही घडले आहे.

