(देवळे / प्रकाश चाळके)
कोकणातील नारळाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावे आणि स्थानिक नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहता यावे यासाठी “क्रांती व्यापारी” संस्थेच्या वतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. संस्थेने कोकण कृषी विद्यापीठ, कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड तसेच नारळ संशोधन केंद्राकडे आधुनिक नारळ सोलणी तंत्रज्ञान प्रशिक्षणाची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी तामिळनाडूमध्ये प्रचलित असलेली “सेमी-हस्किंग” अथवा “चार बाजू सोलणी” पद्धत कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे शिकविण्याची मागणी केली आहे. या आधुनिक तंत्रामुळे नारळाचा दर्जा सुधारून तो निर्यातीसाठी अधिक उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या कोकणात पारंपरिक “सापसोल” पद्धतीने नारळ सोलला जातो. मात्र या पद्धतीमुळे नारळातील पाणी लवकर आटणे, वाहतुकीदरम्यान नारळ तडकणे, टिकाऊपणा कमी होणे आणि बाजारपेठेत आकर्षक सादरीकरणाचा अभाव अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याउलट तामिळनाडूमधील “चार बाजू शिल्लक ठेवून सोलणी” पद्धतीमुळे नारळ अधिक काळ टिकून राहतो, त्यातील पाणी सुरक्षित राहते तसेच वाहतुकीदरम्यान तडे जाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे नारळाला आकर्षक आणि ‘एक्स्पोर्ट क्वालिटी’ स्वरूप प्राप्त होते. देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत अशा प्रकारच्या नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोकणातील नारळाची गुणवत्ता उत्कृष्ट असूनही आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या अभावामुळे स्थानिक उत्पादक मागे पडत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठ, कोकोनट बोर्ड आणि नारळ संशोधन केंद्र यांनी संयुक्तपणे कोकणात प्रशिक्षण शिबिरे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी स्थानिक समन्वय, शेतकरी सहभाग आणि पहिले प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी “क्रांती व्यापारी” संस्था पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी स्पष्ट केले.

